बेळगाव (शहापूर) :
२७ डिसेंबर रात्री ११ वाजता ते २८ डिसेंबर पहाटे साडेचारच्या दरम्यान शहापूर हट्टीहोळ गल्ली येथे दुचाकी जाळल्याची खळबळजनक घटना घडली होती. शुभम श्रीकांत कडोलकर यांच्या घरासमोरील मंडपासाठी लावण्यात आलेल्या बांबूंना अज्ञातांनी आग लावली होती. या आगीमुळे बांबूच्या शेजारी उभ्या असलेल्या चार दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या होत्या.
या प्रकरणी शुभम कडोलकर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन अज्ञात व्यक्ती हे कृत्य करताना स्पष्टपणे दिसून आल्या होत्या.
सदर घटनेचा तपास शहापूर पोलीस ठाण्याच्या मुख्य पोलीस निरीक्षक सीमानी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी दोघा संशयितांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे ऋषिकेश कडोलकर (रा. कोरे गल्ली) आणि विशाल चौगुले (रा. कोरे गल्ली, सध्या रा. आनंदनगर, वडगाव) अशी आहेत.
दोन्ही आरोपींना शहापूर पोलिसांनी अटक करून त्यांच्यावर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
