बेळगाव:
शिक्षणाची उज्ज्वल आणि गौरवशाली परंपरा जपणाऱ्या बेळगाव एज्युकेशन सोसायटीच्या बी.के. मॉडेल हायस्कूलने आपल्या यशस्वी शैक्षणिक वाटचालीची शंभर वर्षे पूर्ण केली आहेत. या ऐतिहासिक शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचा शुभारंभ उद्या, शुक्रवार दि. १९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता सुप्रसिद्ध विनोदी कलाकार गंगावती प्राणेश यांच्या बहारदार कार्यक्रमाने होणार आहे.
सुमारे एक शतकापूर्वी, २ फेब्रुवारी १९२५ रोजी सात ध्येयवेड्या तरुण शिक्षकांनी एका भाड्याच्या खोलीत मॉडेल इंग्लिश स्कूलची स्थापना केली. कालांतराने या संस्थेचा भव्य वटवृक्ष झाला असून आज सात विविध शैक्षणिक शाखांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत.
संस्थेचे अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शताब्दी महोत्सवाची नांदी या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाने होणार असून समाजप्रबोधन आणि मनोरंजन यांचा संगम साधणारा हा कार्यक्रम ठरणार आहे. आपल्या खुसखुशीत शैलीतून जीवनातील विसंगतींवर मार्मिक भाष्य करणारे विनोदवीर गंगावती प्राणेश या कार्यक्रमात रसिकांना खळखळून हसवतील.
हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असल्याने संस्थेचे आजी-माजी विद्यार्थी, पालक, शिक्षणप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शताब्दी महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष अविनाश पोतदार यांनी केले आहे.
