बेळगाव : देशभरात 14 नोव्हेंबर रोजी साजरा होणाऱ्या बालदिनी बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फेही बालदिन मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे प्रसिद्ध चित्रकार व माजी मुख्याध्यापक श्री. वसंत निर्मळे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व स्केटिंगपटूंना मिठाई वाटप करून बालदिनानिमित्त सर्वांचे तोंड गोड करण्यात आले. यावेळी निर्मळे सरांनी या दिवसाचे महत्त्व स्पष्ट करत मुलांनी क्रीडा व शिक्षणाबरोबरच संस्कारांना महत्त्व देण्याचे मार्गदर्शन केले. तसेच सर्व स्केटर्सना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला समाजसेविका भक्ती शिंदे, शिवानी मोदगेकर, स्नेहल माने, ज्योती जिगजीनी, रिया जिगजीनी, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर तसेच असोसिएशनचे स्केटर्स व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बालदिनाचा आनंद सर्वांनी मिळून साजरा करत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
