भाषिक अल्पसंख्यांक उपायुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र — मराठी फलकांवर रंग फासण्याच्या घटनेवर चौकशी व कार्यवाहीचे आदेश
बेळगाव : राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात मराठी आणि इंग्रजी फलकांवर महानगरपालिकेच्या वतीने रंग फासण्यात आल्याच्या प्रकरणी भाषिक अल्पसंख्यांक उपायुक्तांनी जिल्हाधिकारी व अल्पसंख्यांक विभागाचे नोडल अधिकारी बेळगाव यांना पत्र पाठवून चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने या संदर्भात उपायुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर उपायुक्तांनी संबंधित घटनेची नोंद घेऊन भाषिक अल्पसंख्यांकांच्या अधिकारांचे रक्षण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.
राज्योत्सव काळात बेळगाव बाजारपेठ परिसरात महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मराठी आणि इंग्रजी भाषेतील फलकांवर जबरदस्तीने रंग फासले तसेच काही ठिकाणी कन्नडव्यतिरिक्त फलक जप्त केल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर समितीने न्यायालयीन निकालाचा उल्लेख करत (W.P. 7525/2024) कर्नाटक उच्च न्यायालयाने कोणावरही कन्नड फलकांची सक्ती करू नये, असा निकाल दिला असल्याचे नमूद केले. त्यासोबतच फलकांवर रंग फासण्याचे व्हिडिओ आणि छायाचित्रे पुराव्यासह उपायुक्तांकडे सादर करण्यात आली.
या सर्व प्रकरणाची चौकशी करून त्यावर कोणती कार्यवाही करण्यात आली याचा सविस्तर अहवाल पाठविण्याच्या सूचना केंद्रीय भाषिक अल्पसंख्यांक उपायुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात उपायुक्तांनी बेळगाव दौरा केला होता. त्या वेळी जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत भाषिक अल्पसंख्यांकांच्या मागण्या आणि हक्कांविषयी चर्चा करून काही उपाययोजना करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. त्या संदर्भात अद्याप कोणती कार्यवाही झाली, याबाबतही उपायुक्तांनी स्पष्टीकरण मागितले आहे.
हे पाचवे स्मरणपत्र असून, उपायुक्तांचे नवीन पत्र जोडपत्र समितीला पाठविण्यात आले असल्याचे समजते.
