बेळगाव (प्रतिनिधी) : भारतीय हॉकीच्या गौरवशाली प्रवासाला यंदा १०० वर्षे पूर्ण होत असून, या वैभवशाली शतकपूर्तीचा शताब्दी महोत्सव शुक्रवार दि. ७ नोव्हेंबर रोजी देशभरात उत्साहात साजरा होणार आहे. या निमित्ताने बेळगावमध्ये टिळकवाडी येथील नेताजी सुभाषचंद्र लेले मैदानावर सकाळी ११.३० वाजता भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘हॉकी बेळगाव’च्या वतीने आयोजित या सोहळ्यास खासदार जगदीश शेट्टर, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार राजू शेठ, आमदार अभय पाटील, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायतचे कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, जॉइंट कमिशनर सागर देशपांडे तसेच प्रगती वाहिनीचे संपादक एम. के. हेगडे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमानिमित्त महाविद्यालयीन मुला-मुलींचे हॉकी सामने आयोजित करण्यात आले असून, त्याचे प्रायोजकत्व अमोदराज स्पोर्ट्सने स्वीकारले आहे. या निमित्ताने बेळगावकरांना हॉकीचा थरार अनुभवता येणार आहे.
भारतीय हॉकीच्या वैभवाची १०० वर्षांची कहाणी
७ नोव्हेंबर १९२५ रोजी भारतीय हॉकीला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाशी (FIH) संलग्नता मिळाली आणि त्यानंतर भारतीय हॉकीने केवळ खेळाच्या पातळीवर नव्हे, तर राष्ट्रीय अभिमानाच्या पातळीवर आपली अमिट छाप सोडली. फक्त तीन वर्षांत म्हणजे १९२८ मध्ये अॅमस्टरडॅम येथे भारताने पहिले ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकले आणि हॉकी महासत्ता म्हणून जगभरात नावलौकिक मिळवला.
१९२८ ते १९५९ हा भारताच्या हॉकीचा सुवर्णकाळ ठरला — आठ ऑलिंपिक सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्यपदकांसह देशाने क्रीडा इतिहासात नवे शिखर गाठले. नंतरच्या दशकांत आव्हाने आली, पण भारतीय हॉकीने टोकियो २०२० ऑलिंपिकमधील कांस्यपदक आणि पॅरिस २०२४ मधील आणखी एका पोडियम फिनिशद्वारे पुन्हा अभिमानाचे स्थान मिळवले.
देशभरात उत्सवाचा जल्लोष
हॉकी इंडिया या शताब्दी वर्षानिमित्त देशातील ५०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी स्मरणोत्सव आयोजित करत आहे. १,००० हून अधिक सामने आणि ३६,००० खेळाडूंचा सहभाग या ऐतिहासिक क्षणाला अधिक भव्य बनवणार आहे. नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियमवर माननीय क्रीडा मंत्री इलेव्हन विरुद्ध हॉकी इंडिया इलेव्हन यांच्यात प्रदर्शनीय सामना होईल. “भारतीय हॉकीची १०० वर्षे” या स्मारक ग्रंथाचे प्रकाशन आणि ऐतिहासिक छायाचित्र प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
हॉकी इंडियाचे अध्यक्ष डॉ. दिलीप तिर्की म्हणाले, “ही शताब्दी म्हणजे आपल्या नायकांच्या आत्म्याचा आणि लवचिकतेचा सन्मान आहे. आपल्या सुवर्ण दिग्गजांपासून ते आजच्या तरुण स्टार्सपर्यंत, प्रत्येकाने भारतीय हॉकीला नवे रूप दिले.”
तर सरचिटणीस भोलानाथ सिंह यांनी म्हटले, “हॉकी हा भारताच्या लोकांचा खेळ आहे आणि हा उत्सव प्रत्येक चाहत्यासाठी, प्रत्येक खेळाडूसाठी आहे.”
या शतकपूर्ती उत्सवात बेळगाव ‘हॉकी बेळगाव’च्या माध्यमातून आपले योगदान नोंदवत असून, कार्यक्रमाचे आयोजन आणि तयारी जोरात सुरू आहे.
