बेळगाव : भारत स्वतंत्र झाल्यानंतर १ नोव्हेंबर १९५६ रोजी भारतातील राज्यांची भाषावार पुनर्रचना करण्यात आली. या पुनर्रचनेदरम्यान राज्य पुनर्रचना आयोगाने पूर्वीच्या मुंबई राज्यातील बेळगाव, कारवार आणि हैदराबादच्या बिदर जिल्ह्यातील काही मराठी भाषिक प्रदेश त्या वेळच्या म्हैसूर राज्यात (सध्याचे कर्नाटक) समाविष्ट करण्याची शिफारस केली. मराठी भाषिकांवर झालेल्या या अन्यायाविरोधात तीव्र आंदोलने झाली.
१७ जानेवारी १९५६ रोजी बेळगावात झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या गोळीबारात चौघे जण हुतात्मा झाले, तर निपाणी येथे कमळाबाई मोहिते यांनी हौतात्म्य पत्करले. त्यानंतर झालेल्या सत्याग्रहांमध्ये हजारो मराठी सत्याग्रहींना कारावास भोगावा लागला. तरीदेखील केंद्र सरकारने मराठी भाषिक भाग म्हैसूर राज्यातच ठेवण्याचा निर्णय घेतला.
या निर्णयाच्या निषेधार्थ १ नोव्हेंबर १९५६ रोजी सीमाभागात पहिल्यांदा काळा दिन पाळण्यात आला आणि त्या दिवसापासून आजपर्यंत दरवर्षी हा दिवस काळ्या दिन म्हणून पाळला जातो.
या वर्षीही म्हणजेच १ नोव्हेंबर २०२५ रोजी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने संपूर्ण सीमाभागात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बेळगावात या दिवशी सायकल फेरी व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून सायकल फेरीची सुरुवात सकाळी साडेनऊ वाजता संभाजी उद्यान येथून होणार आहे.
सायकल फेरी नेहमीच्या मार्गाने फिरून मराठा मंदिर, खानापूर रोड येथे पोहोचेल आणि तेथे जाहीर सभा घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमात बेळगाव शहर व तालुक्यातील मराठी जनतेने, महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बेळगाव शहर व तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
#Belgav #BedhadakBelgav
