राणी चन्नम्मा संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालय, इटगी येथे ४० विद्यार्थ्यांना दाखले न दिल्याने आंदोलन भडकले – प्रिंसिपलविरुद्ध बीईओकडे तक्रार
खानापूर तालुक्यातील इटगी येथील राणी चन्नम्मा संयुक्त पदवीपूर्व महाविद्यालयाने तब्बल ४० विद्यार्थ्यांना दाखले (टीसी) देण्यास नकार दिल्यामुळे आज विद्यार्थ्यांनी बीईओ कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडले. या घटनेमुळे संपूर्ण खानापूर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.
लहान वयातील हे विद्यार्थी रात्र झाल्यानंतरही बीईओ कार्यालयासमोर बसलेले असून, प्रशासन व शिक्षण विभागाच्या दुर्लक्षाबद्दल सर्वत्र टीका होत आहे. पालकांनी प्रिंसिपलवर गंभीर आरोप करत बीईओकडे लेखी तक्रार दिली असून, बीईओ यांनी ती तक्रार घेऊन स्वतः नंदगड पोलिस ठाण्यात प्रिंसिपलविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, प्रिंसिपलचा दावा आहे की “हायकोर्टचा स्टे आहे” त्यामुळे दाखले देता येणार नाहीत. मात्र, असा कोणताही “दाखले देऊ नका” असा आदेश हायकोर्टकडून आहे का, असा प्रश्न पालक व विद्यार्थी विचारत आहेत.
आंदोलनाच्या ठिकाणी बीईओ, त्यांचा स्टाफ, तसेच खानापूर ब्लॉक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. ब्लॉक काँग्रेसने विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहत संस्थाचालकांना तातडीने दाखले देण्याचे आवाहन केले आहे. “आम्ही कोणत्याही संस्थेच्या विरोधात नाही, पण ४० विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी उभे आहोत,” असे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, सरकारच्या निधीतून पगार घेणाऱ्या एडेड शाळेतील प्रिंसिपलने बीईओसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश न पाळणे हे शिक्षण विभागासाठीच कलंकासमान आहे.
या सर्व घडामोडी तालुक्याचे विद्यमान आमदार स्वतः शिक्षकी पेशाचे असताना घडत असल्याने, परिस्थिती अधिक वेदनादायक असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.

 
                     
             
                                         
                                        