बेळगाव (प्रतिनिधी) — बेळगाव सीमाभागात युवासेनेचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने बेळगाव युवासैनिकांची एक विशेष आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत युवासेनेच्या कार्याची दिशा, भविष्यातील कार्यक्रमांचे नियोजन आणि सीमाभागातील मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी युवाशक्तीचा अधिक प्रभावी वापर कसा करता येईल यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीत विनायक हुलजी, सोमनाथ सावंत, मल्हार पावशे, अद्वैत चव्हाण पाटील, विद्येश बडसकर, ओमकार बैलूरकर, महेश मजुकर, अमेश देसाई, सक्षम कंग्राळकर, प्रणय पाटील, वैभव मारगणाचे आणि इतर युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत सीमाभागातील मराठी जनतेच्या हक्कांसाठी आणि मराठी अस्मितेच्या जपणुकीसाठी युवासेनेची भूमिका अधिक सक्षम करण्याचा निर्धार करण्यात आला. सीमाभागात मराठी अस्मितेसाठी युवाशक्ती अधिक प्रभावी करणार असा ठाम संदेश या बैठकीतून देण्यात आला.
यावेळी आगामी उपक्रमांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. तसेच, गेल्या वर्षी युवासेना बेळगावतर्फे आयोजित करण्यात आलेल्या भव्य किल्ला स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण सोहळा याच दिवशी घेण्याचे निश्चित करण्यात आले.
या बैठकीमुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, मराठी समाजहितासाठी कार्य करण्याची नवी ऊर्जा निर्माण झाली आहे. आगामी काळातही युवासेना सीमाभागातील मराठी जनतेच्या अस्मिता, संस्कृती आणि हक्कांच्या रक्षणासाठी कटिबद्ध राहील असा निर्धार या बैठकीतून करण्यात आला.
