बेळगाव – अलीकडेच पार पडलेल्या कर्नाटक राज्य कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीत राज्यातील सर्व सरकारी व्यवहार व कामकाज फक्त कन्नड भाषेत राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा तीव्र निषेध करत आज महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या वतीने बेळगाव ग्रामीणच्या आमदार व कर्नाटक राज्याच्या मंत्रिपदी असलेल्या मा. लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांवर कन्नड भाषा सक्ती हा अन्याय असून, तो भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 29(1), 350A आणि 350B च्या तरतुदींना विरोध करणारा आहे. या अनुच्छेदांनुसार, अल्पसंख्यांक भाषिकांना त्यांची मातृभाषा जपण्याचा आणि शैक्षणिक-प्रशासकीय सेवा त्याच भाषेत मिळण्याचा अधिकार आहे. याशिवाय TMA Pai Foundation Vs. State of Karnataka या सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा हवाला देत, राज्य शासन कोणत्याही भाषिक अल्पसंख्यांकावर भाषा थोपवू शकत नाही, हे शुभम शेळके यांनी अधोरेखित केले.
युवा समितीने हेही अधोरेखित केले की, भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने पूर्वीच शिफारस केली होती की, बेळगाव महानगरपालिका व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेतील सेवा उपलब्ध करावी. मात्र, या शिफारसीची अंमलबजावणी न करता उलटपक्षी अजून अधिक कडक कन्नड सक्ती लादली जात आहे.
युवा समितीने पुढील तीन प्रमुख मागण्या मांडल्या:
1. मराठी भाषिक अल्पसंख्यांकांचे संवैधानिक हक्क राज्य शासनाकडून सुनिश्चित करावेत.
2. शासकीय कार्यालयांमध्ये मराठी भाषेतील सेवा व कागदपत्रे तत्काळ उपलब्ध करावीत.
3. कन्नड सक्तीचा निर्णय रद्द करण्यासाठी शासनावर दबाव आणावा.
या निवेदनप्रसंगी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी या विषयातील कायदेशीर तरतुदी अभ्यासून योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.यावेळी प्राध्यापक डॉ अच्युत माने, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, खजिनदार व नगरसेवक शिवाजी मंडोळकर, युवा समिती निपाणीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, समिती नेते शिवाजी हावळाण्णाचे,महादेव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख सचिन गोरले, समिती नेते पिराजी मुंचडीकर, अशोक घगवे, चंद्रकांत पाटील, नारायण मुंचडीकर, विजय जाधव, रमेश माळवी,अभिजित मजुकर, सागर कणबरकर ,अश्वजित चौधरी,सुनिल किरळे, अमर विठे,तात्यासाहेब कांबळे,राजकुमार मेस्त्री सतिष पाटील,किरण मोदगेकर सुरज जाधव, अभिजित कारेकर,अशोक डोळेकर,किसन सुंठकर, भागोजीराव पाटील,के.एम.कोल्हे, राजकुमार बोकडे,सागर सागावकर, यल्लाप्पा पाटील, बाबु पावशे, निलेश काकतकर,विनायक मजुकर, शिवम जाधव, जोतिबा येळ्ळूरकर,सागर कडेमनी, आकाश कडेमनी, रमेश मोदगेकर, शामराव पाटील, मधू मोदगेकर, सचिन मोदगेकर, प्रकाश पाटील, चंद्रकांत मोदगेकर, गजानन शहापूर, मोतेश बारदेशकर,शंकर कोणेरी निरंजन जाधव, सुधीर शिरोळे, विनायक पवार,परशराय बसरीकट्टी यांच्यासह युवा समिती सीमाभाग बेळगाव, निपाणी युवा समिती, बेळगाव शिवसेना यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भाषिक अन्यायाविरोधातील ही लढाई आता निर्णायक टप्प्याकडे जात असून, शासनाने लक्ष न दिल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.