बेळगाव, 26 जुलै: कर्नाटक राज्यातील कन्नड प्राधिकरणाच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत राज्यातील सर्व सरकारी ठिकाणी 100 टक्के कन्नड सक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या तीव्र निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभागच्या वतीने बैठक घेण्यात आली.
या बैठकीत सीमाभागातील मराठी भाषिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी सर्व सरकारी ठिकाणी मराठी भाषेचा वापर सक्तीचा करण्याचा ठराव घेण्यात आला असून, स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून या प्रश्नावर आवाज उठवण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
त्याच अनुषंगाने युवा समितीच्या वतीने उद्या रविवार, दिनांक 27 जुलै रोजी सकाळी 9 वाजता बेळगाव ग्रामीणच्या आमदार तथा राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री मा. लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेण्यात येणार आहे. ही भेट त्यांच्या निवासस्थानी होणार असून, जिल्हाधिकारी कार्यालय बेळगाव येथून युवा समिती कार्यकर्ते रवाना होणार आहेत.
या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी युवा समिती सिमाभागचे सरचिटणीस मनोहर हुंदरे (संपर्क क्रमांक: 99453 46640) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
— महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सिमाभाग