जत्तीमठ, बेळगाव | 10 जुलै 2025
कर्नाटक सरकारच्या कन्नड सक्तीच्या निर्णयाविरोधात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्यावतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर जत्तीमठ येथे समितीची विशेष कार्यकारिणी बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा समिती सीमाभाग अध्यक्ष शुभम शेळके होते.
कर्नाटक कन्नड प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयानुसार आता सर्वच सरकारी ठिकाणी फक्त कन्नड भाषेतील पाट्या लावाव्यात, असे फतवे जारी करण्यात आले आहेत. याचा निषेध करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली. मराठीसह इतर भाषांवरील अन्यायाला विरोध करत मराठी भाषिकांची गळचेपी थांबवावी, अशी ठाम भूमिका बैठकीतून मांडण्यात आली.
बैठकीच्या प्रारंभी बी. एस. पाटील (माजी संचालक, मराठा बँक) आणि महादेव पाटील (ज्येष्ठ पंच, संभाजी रोड) यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समितीच्या इतर दिवंगत कार्यकर्त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या वेळी महाराष्ट्र सरकारकडून सीमासंवाद समिती आणि तज्ज्ञ समितीची पुनर्रचना केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. यासोबतच सरन्यायाधीशपदी भुषण गवई यांच्या निवडीचेही अभिनंदन करण्यात आले.
कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी बैठकीचे प्रास्ताविक करत कार्यकर्त्यांमध्ये जागरुकता निर्माण केली. सरचिटणीस मनोहर हुंदरे, अशोक घगवे, चंद्रकांत पाटील, नगरसेवक आणि खजिनदार शिवाजी मंडोळकर यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी मनोगत व्यक्त केले.
बैठकीत महत्त्वाचा ठराव म्हणून सीमाभागातील मराठी बहुभाषिक मतदारसंघातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना व महापौरांना निवेदन देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यांच्याशी चर्चा करून कन्नड सक्तीला विरोध करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच राष्ट्रीय पक्षांमधील मराठी प्रतिनिधींनी मराठी भाषेवरील अन्यायाविरोधात आवाज उठवावा, असे ठाम मत व्यक्त झाले.
जर कन्नड सक्तीचा निर्णय मागे घेण्यात आला नाही, तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.
या बैठकीस नारायण मुंचडीकर, विजय जाधव, प्रविण रेडेकर, राजू पाटील, सुधीर शिरोळे, रमेश माळवी, बाबू पावशे, रामनाथ मुंचडीकर, जोतिबा चौगुले, आकाश कडेमनी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी सीमाभागातले युवक निर्धाराने एकत्र येत आहेत, ही या बैठकीची जमेची बाजू ठरली.