बेळगाव | 11 जुलै 2025
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांच्या वतीने एस. के. ई. सोसायटीच्या एम. व्ही. शानभाग शाळेमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने हा उपक्रम सातत्याने राबवला जातो.
कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या वतीने युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून झाली. यावेळी निपाणी तालुका समितीचे अध्यक्ष अजित पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, “मराठी भाषा आणि संस्कृती जपायची असेल, तर सीमाभागातील मराठी शाळांचे अस्तित्व टिकवणे नितांत गरजेचे आहे.“
यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसला.
कार्यक्रमास माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. खणगावकर, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका गायत्री शिंदे, युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, उपाध्यक्ष राजू कदम, सरचिटणीस श्रीकांत कदम, सुरज कुडूचकर, तसेच निपाणी युवा समितीचे सदस्य अमोल पाटील, अनिकेत नाईक, ओमकार नाईक, ओमकार खोत, क्रीडाशिक्षक आर. बी. परीट, सहशिक्षिका मेघना मांडेकर व शाळेतील इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.
प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन सहशिक्षक तानाजी पाटील यांनी उत्तम प्रकारे पार पाडले.
मराठी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा हा उपक्रम सीमाभागातील शिक्षण क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा आहे, असे उपस्थित शिक्षक आणि पालकांनी मत व्यक्त केले.