बेळगाव : शहरात वाढत्या अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन शालेय वेळेत अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी करावी, अशी मागणी करत निवेदन सादर केले.
ऑगस्ट २०२२ मध्ये कॅम्प भागात अवजड वाहनाच्या धडकेत एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने शालेय वेळेत अशा वाहनांवर निर्बंध घातले होते. मात्र आता पुन्हा एकदा सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत ही वाहने शहरातील रस्त्यांवर धावत असल्याने रेल्वे उड्डाणपूल, प्रमुख चौक तसेच शाळांच्या परिसरात वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका वाढला आहे.
समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी पदाधिकाऱ्यांसमवेत पोलीस आयुक्तांना भेट देत, सकाळी ८ ते १०.३० व दुपारी ३ ते सायं. ६ या शालेय वेळेत शहरात अवजड वाहनांना प्रतिबंध करण्याची मागणी केली.
पोलीस आयुक्तांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती पावले उचलली जातील, असे आश्वासन दिले.
यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष वासू सामजी, सरचिटणीस श्रीकांत कदम, विनायक कावळे, सुरज कुडूचकर, किरण हुद्दार, संतोष कृष्णाचे, ॲड. वैभव कुट्रे, शेखर तळवार, शांताराम होसुरकर, सुरज चव्हाण, ॲड. अश्वजीत चौधरी आदी उपस्थित होते.