बेळगाव, १ ऑगस्ट – कर्नाटक सरकारकडून सीमाभागात जबरदस्तीने लादली जात असलेली कन्नड भाषा आणि त्यातून मराठी भाषिक अल्पसंख्यांकांवर होणारा अन्याय थांबवण्याची जोरदार मागणी युवा समिती सीमाभागच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी समितीच्या शिष्टमंडळाने खासदार श्री. जगदीश शेट्टर यांची भेट घेऊन निवेदन दिले.
नुकत्याच पार पडलेल्या कन्नड प्राधिकरणाच्या बैठकीत राज्यभर फक्त कन्नड भाषेचा सक्तीने वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय भारतीय संविधानातील अनुच्छेद 29(1), 350A आणि 350B यांचा भंग करत असून, मराठी भाषिक अल्पसंख्यांकांच्या मूलभूत हक्कांना बाधा आणणारा आहे, असे निवेदनात ठामपणे नमूद करण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या विविध निर्णयांतूनही राज्य सरकार कोणत्याही भाषिक अल्पसंख्यांवर भाषा लादू शकत नाही, हे स्पष्ट करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारच्या भाषिक अल्पसंख्यांक आयोगाने यापूर्वीच जिल्हा प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या असून, बेळगाव महानगरपालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषेतही कागदपत्रे व सेवा पुरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करून आता कन्नड सक्ती आणखी तीव्र करण्यात येत आहे.
युवा समितीच्या अध्यक्ष शुभम शेळके यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने खासदार शेट्टर यांच्याकडे खालील तीन प्रमुख मागण्या मांडल्या:
- मराठी भाषिक अल्पसंख्यांकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी राज्य शासनावर दबाव टाकावा.
- शासकीय कार्यालयांतून मराठीतून सेवा आणि कागदपत्रे देण्याचे आदेश तत्काळ जारी करावेत.
- कन्नड सक्तीचा निर्णय त्वरित मागे घेण्याची कार्यवाही करावी.
या मागण्या जर शासनाने दुर्लक्षित केल्या, तर सीमाभागातील मराठी जनता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारेल, आणि याचे परिणाम दोन्ही राज्यांत उमटतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
खासदार शेट्टर यांनी निवेदन स्वीकारताना मराठी भाषिकांवर अन्याय होऊ नये यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे सांगून उद्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बैठकीत हा विषय उपस्थित करून तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
या प्रसंगी समितीचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस मनोहर हुंदरे, नगरसेवक शिवाजी मंडोळकर, नारायण मुंचडीकर, महादेव पाटील, शिवाजी हावळाण्णाचे, चंद्रकांत पाटील, रमेश माळवी, वैराळ सुळकर, अभिषेक कारेकर, चेतन पेडणेकर, जोतिबा येळ्ळूरकर, रिचर्ड्स अँथोनी, सुरज जाधव, महेंद्र जाधव, गणेश मोहिते, मोतेश बारदेशकर, किरण मोदगेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.