येळ्ळूर, ता. बेळगाव (प्रतिनिधी):महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने मातृभाषेतील शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक आधार देण्यासाठी येळ्ळूर परिसरातील विविध मराठी प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमात मराठी मॉडेल प्राथमिक शाळा, येळ्ळूरवाडी मराठी प्राथमिक शाळा, चांगळेश्वरी प्राथमिक शाळा, तसेच समिती पूर्व प्राथमिक शाळा यांचा समावेश होता.
मॉडेल मराठी प्राथमिक शाळेत कार्यक्रम
या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा सुधारणा समितीचे उपाध्यक्ष जोतिबा उडकेकर होते. सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.येळ्ळूर ग्रामपंचायतीचे माजी अध्यक्ष श्री. सतीश पाटील यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून मराठी शाळांच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांनी मराठी भाषेच्या जतनासाठी सर्वांनी कटिबद्ध राहण्याचे आवाहन केले.
युवा समितीचे सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी शैक्षणिक उपक्रमाचे सविस्तर विवरण देताना सांगितले की, यंदाच्या वर्षी हा उपक्रम ३०० शाळांमध्ये राबविण्याचे उद्दिष्ट आहे. शाळेच्या सातत्यपूर्ण कार्याचे कौतुक करत त्यांनी शाळा व शिक्षकांचे अभिनंदन केले.
यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र चलवादी, माजी सदस्य सतीश कुगजी, सुरज कुडूचकर, प्रतीक पाटील, रितेश पावले, शिक्षकवृंद, पालक, विद्यार्थी तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एम. एस. मंडोळकर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले तर श्री. सातेरी पाखरे यांनी आभार मानले.
येळ्ळूरवाडी मराठी शाळेतही प्रेरणादायी कार्यक्रम
येथील कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे शिक्षक नारायण पाटील यांनी भूषवले.युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर आणि कार्याध्यक्ष सचिन केळवेकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना युवा समितीचे पदाधिकारी म्हणाले की, मातृभाषेतील शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या मूलभूत विकासासाठी महत्त्वाचे आहे. प्रत्येक गावात बालवाडी वर्ग सुरू करून पटसंख्या वाढवता येईल, यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
चांगळेश्वरी व समिती शाळांमध्येही उपक्रम राबवला
याच दिवशी चांगळेश्वरी प्राथमिक शाळा व येळ्ळूर पूर्व समिती शाळा येथेही साहित्याचे वितरण करण्यात आले. शाळा टिकवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
—शिक्षण, भाषा आणि संस्कृती यांचे संगोपन करण्यासाठी युवा समितीच्या उपक्रमांचे स्वागत आहे. मातृभाषेतील शिक्षणाला बळ मिळावे यासाठी असे उपक्रम भविष्यातही चालू राहावेत, अशी अपेक्षा शिक्षणप्रेमींनी व्यक्त केली आहे.