बेळगाव – यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच हवामानातील बदल व पावसाच्या विस्कळीततेमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अर्धवट मशागतीमुळे बियाण्यांची उगम चांगली न झाल्याने अनेकांना दुबार पेरणी व लावणीचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक उभं करण्यासाठी जमिनीत नत्र वाढवणं आवश्यक ठरतंय, त्यामुळे युरियाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, अजूनही अनेक शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध झालेले नाही.
युरिया खरेदी करताना लिंक पद्धतीने इतर अनावश्यक खतं वा बाटल्या घेण्याची सक्ती केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येतो आहे. लहान शेतकऱ्यांना याचा आर्थिक फटका बसतो आहे. बाटली घेतली तर पंप भाड्याने आणावा लागतो, फवारणीचा खर्च वेगळाच – अशा परिस्थितीत सरकारने वेळीच लक्ष न दिल्यास शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, मोफत बस प्रवासाच्या घोषणेनंतरही महिला शेतकऱ्यांना अजूनही तिरस्काराचा व अरेरावीचा अनुभव येतो आहे. वडगाव, शहापूर, जुनेबेळगाव, येळ्ळूर, धामणे या भागांतील महिला लावणीसाठी सकाळी लांब अंतर पार करतात. परंतु बस चालक व वाहक मधल्या थांब्यांवर बस न थांबवता थेट पुढे जात असल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे महिलांना सक्तीने रिक्षाचा पर्याय घ्यावा लागतो व त्याचा भरमसाठ खर्च सहन करावा लागतो.
येळ्ळूर रस्त्यावर परिवहन खात्याने अधिकृत थांबे दर्शवणारे फलक लावले असूनही बस तिथे थांबत नाहीत. बस चालक व वाहकांची वृत्ती ही अपमानजनक असल्याचे शेतकरी महिलांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी धामणे रस्त्यावर ७.३० च्या सुमारास एकाही बसने थांबण्याची तसदी घेतली नाही. रिक्षाने वडगावमध्ये पोहोचलेल्या महिलांनी बस अडवून आपला संताप व्यक्त केला. दुसऱ्या घटनेत, पावसात चिंब झालेल्या एका महिलेला बसमधील खुर्चीवर बसण्यापासून रोखले गेले. मात्र, अन्य महिलांनी तीव्र प्रतिकार करत वाहकाला चांगलेच सुनावले.
या सर्व प्रकारामुळे आता शेतकरी व महिलांमध्ये असंतोष वाढला असून लवकरच युरिया वितरणासाठी जबाबदार खात्याविरुद्ध व परिवहन विभागाविरोधात धडक आंदोलन छेडले जाणार आहे.
“शेतकरी हा देशाचा कणा आहे, आणि महिला शेतकरी त्या कण्याला बळ देतात – त्यांच्या अपमानास व संकटांना दुर्लक्ष करता येणार नाही,” असा निर्धार करत शेतकरी संघटनांनी इशारा दिला आहे.