बेळगाव तालुका, दि. २१ (प्रतिनिधी) : आईच्या निधनाच्या धक्क्यातून सावरू न शकल्याने मानसिक तणावाखाली असलेल्या आंबेवाडी येथील बाबू पांडू सांबरेकर (वय ४१) या युवकाचा जीव वेळेवर मिळालेल्या मदतीमुळे वाचला.
मिळालेल्या माहितीनुसार, पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या आईचे निधन झाले होते. त्या दुःखातून ते सावरू शकले नव्हते. शनिवारी सकाळी गावाच्या अगोदर असलेल्या विहिरीत ते पडले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला; मात्र यश न आल्याने तात्काळ HERF Rescue Team शी संपर्क साधण्यात आला.
कॉल मिळताच टीमचे प्रमुख बसवराज हिरेमठ अवघ्या सात मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. कोणतेही विशेष रेस्क्यू साहित्य उपलब्ध नसताना त्यांनी कमरेला दोरी बांधून स्वतः विहिरीत उतरून धाडसाने बचावकार्य केले. संबंधित युवकाला धीर देत आणि सतत संवाद साधत त्यांनी त्याला सुरक्षित बाहेर काढले.
या प्रसंगामुळे वेळेवर दिलेल्या माहितीचे आणि तात्काळ प्रतिसादाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. गेली सोळा वर्षे H.E.R.F. रेस्क्यू टीम आपत्ती, अपघात आणि विविध आपत्कालीन घटनांमध्ये अहोरात्र सेवा देत असून, प्रत्येक कॉलला ते तातडीने प्रतिसाद देतात.
या धाडसी कार्याबद्दल आंबेवाडी ग्रामस्थांनी बसवराज हिरेमठ आणि संपूर्ण H.E.R.F. रेस्क्यू टीमचे अभिनंदन करून आभार मानले. आपत्कालीन परिस्थितीत अचूक व संपूर्ण माहिती देऊन तात्काळ संपर्क साधल्यास अनर्थ टाळता येऊ शकतो, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
#Belgav #BedhadakBelgav
