खानापूर – लोकोळी : “स्त्रियांना हवं तसं जगायला मिळणं म्हणजे सक्षमीकरण नव्हे; तर महिलांची वैचारिक वृद्धी, बौद्धिक सहभाग आणि आत्मविश्वास वाढवणे हाच खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचा मार्ग आहे,” असे प्रतिपादन प्रमुख वक्त्या शिवानी पाटील यांनी केले.
श्रमिक अभिवृद्धी जनजागृती संघ यांच्या वतीने लोकोळी येथे आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला लोकळी ग्रामपंचायत पीडीओ विजयालक्ष्मी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. तसेच श्रमिक अभिवृद्धी जिल्हा संयोजक अँथोनी जॅकेप, यशवंत भांदुर्गे, संजय हुपरी, कार्यकर्ते एल. डी. पाटील, साधना पाटील आदी मान्यवरांनीही उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाली. त्यानंतर महिलांनी सादर केलेल्या ईशस्तवन आणि स्वागत गीताने कार्यक्रमाचे औचित्य साधले.
प्रास्ताविक यशवंत भांदुर्गे यांनी केले, तर सूत्रसंचालन कीर्ती पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे आभार भाग्यश्री माने यांनी मानले.
मेळाव्यात संघाच्या महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आकर्षक सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली. महिला जागरूकता, आत्मनिर्भरता आणि समाजातील सहभाग वाढवण्याच्या दृष्टीने झालेला हा मेळावा यशस्वीरीत्या पार पडला.
