वाल्मीकी समाजाचा संताप — रमेश कत्ती यांच्या अटकेची मागणी; बेळगाव बंदचा इशारा

वाल्मीकी समाजाचा संताप — रमेश कत्ती यांच्या अटकेची मागणी; बेळगाव बंदचा इशारा

बेळगाव, २० ऑक्टोबर:
वाल्मीकी समाजाविषयी अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत समाजातील नेते आणि कार्यकर्त्यांनी माजी खासदार रमेश कत्ती यांच्या विरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. सोमवारी शहरातील चन्नम्मा चौकात रस्ता रोको आणि मानवी साखळी आंदोलन करण्यात आले.

आंदोलनकर्त्यांनी टायर पेटवून दिले, रमेश कत्ती यांच्या छायाचित्राला चप्पल हार घालून ते जाळले आणि “रमेश कत्ती माफी मागा” अशा घोषणा देत आपला निषेध व्यक्त केला.

वाल्मीकी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजशेखर तळवार म्हणाले, “रमेश कत्ती हे जबाबदारीच्या पदावर असूनसुद्धा त्यांनी अनुसूचित समाजाविषयी अत्यंत हलकी भाषा वापरली आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या असून, राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सरकारने तात्काळ कत्ती यांना अटक करावी, अन्यथा येत्या २४ ऑक्टोबरला बेळगाव बंद पुकारला जाईल,” असा इशारा त्यांनी दिला.

नेते सुरेश गवन्नवर यांनीही तीव्र शब्दांत निषेध नोंदवित सांगितले की, “बेडर समाजाचा अपमान आम्ही सहन करणार नाही. ऐतिहासिक वारसा असलेल्या आमच्या समाजाबद्दल तुच्छ शब्द वापरणे हा गुन्हा आहे. सरकारने तातडीने कारवाई केली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.”

या आंदोलनात जिल्हा प्रभारी मंत्री सतीश जारकीहोळी यांचे निकटवर्तीय मलगौडा पाटील, तसेच सिद्दू सुणगार, मल्लाप्पा चिकलदिलनी, अंजुकुमार गंडकुदरी, महेश शीगिहळी, सत्यप्पा तळवार, बाळेश दासनट्टी, कस्तुरी कोलकर, विजय तळवार, परशुराम ढगे, संजय नाईक आदी नेते आणि शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

#Belgav #BedhadakBelgav

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eight + two =

error: Content is protected !!