चलवेनहट्टी ग्रामस्थांचे काकती पोलिसांना निवेदन
चलवेनहट्टी : गावातील गुड्डादेवी मंदिर परिसरात वाढत्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी पोलीस गस्त वाढवावी, अशी मागणी चलवेनहट्टी येथील ग्रामस्थांनी काकती पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ यांनी हे निवेदन स्वीकारले.
ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून मंदिर परिसरातील काजू बागेत बाहेरील युवकांकडून पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. या पार्ट्यांदरम्यान दारू पिऊन धांगडधिंगा करणे, महिलांवर अश्लील टिप्पणी करणे, काचांच्या बाटल्या फोडणे, सिगारेटचे थोटके टाकणे तसेच आपापसांत भांडणे असे प्रकार वारंवार घडत आहेत.
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सिगारेटच्या थोटक्यांमुळे आग लागण्याच्या घटनाही वाढल्या असून, काही दिवसांपूर्वी अशाच एका घटनेत एका शेतकऱ्याची झोपडी व काजूची झाडे जळून नुकसान झाल्याचेही ग्रामस्थांनी नमूद केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात या परिसरात नियमित पोलीस गस्त असल्यामुळे असे प्रकार नियंत्रणात होते. मात्र सध्या गस्त कमी झाल्याने पुन्हा गैरप्रकार वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकारांना विरोध केल्यास संबंधितांकडून अरेरावी केली जात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ यांनी या भागात गस्त वाढवून गैरप्रकारांना आळा घालण्याचे आश्वासन दिले. तसेच अशा घटना आढळल्यास नागरिकांनी ‘११२’ या आपत्कालीन क्रमांकावर तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मनोहर हुंदरे, महांतेश आलगोंडी, अभिजित आलगोंडी, वैजू पाटील, चंद्रकांत आलगोंडी, रघुनाथ आलगोंडी, राम करीबाळे, परशराम आलगोंडी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
