ज्येष्ठ पत्रकार प्रकाश परुळेकर यांचे निधन
बेळगाव :
मूळचे लोंढा येथील आणि सध्या टिळकवाडी, बेळगाव येथे वास्तव्यास असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रकाश श्रीपाद परुळेकर (वय ६७) यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व विवाहित कन्या असा परिवार आहे.
प्रकाश परुळेकर यांनी विविध वृत्तपत्रांत दीर्घकाळ पत्रकारिता करताना स्थानिक प्रश्न, सामाजिक विषय आणि विज्ञान क्षेत्रातील लेखनाद्वारे आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. विज्ञान विषयावरील लेखन ही त्यांची विशेष आवड होती. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘ज्ञानविज्ञान’ नावाचे सदर सुरू ठेवत जनसामान्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जागविण्याचे कार्य केले.
बेळगाव आणि खानापूर तालुक्यांतील राजकारण व समाजकारणाचा त्यांना सखोल अभ्यास होता. विचारशील, तर्कशुद्ध आणि संतुलित मांडणीमुळे ते पत्रकार व वाचकांमध्ये लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्राने एक अनुभवी आणि विचारवंत व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
#Belgav #BedhadakBelgav
