बेळगाव : अंगडी कॉलेजजवळील नानावाडी परिसरात काही व्यक्ती रात्री उशिरापर्यंत दारू सेवन करून बाटल्या फोडत गोंधळ घालत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांनी वडगाव पोलिसांकडे केल्या होत्या. या ठिकाणी काही पुरुषांसोबत महिलाही रात्रीच्या वेळी एकत्र येऊन मोठ्या आवाजात गोंधळ घालत असल्याची माहितीही पोलिसांना देण्यात आली होती.
या तक्रारीवर तत्काळ कार्यवाही करत आज वडगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक स्वतः घटनास्थळी पोहोचले व नागरिकांशी संवाद साधला. त्यांनी नागरिकांना आश्वासन दिले की या भागात नियमितपणे पोलीस गस्त वाहन फिरणार असून अशा प्रकारचे प्रकार पुन्हा घडल्यास “112” या पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा.
पोलिसांच्या या तत्पर कारवाईबद्दल नानावाडीतील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले असून परिसरातील शांतता व सुरक्षितता राखल्याबद्दल वडगाव पोलीस व पोलीस निरीक्षकांचे आभार मानले आहेत.
