बेळगाव : काकती गावाच्या हद्दीत, पौर्णिमा बारजवळील बेळगाव–संकशेवर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवार दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी पहाटे 1.30 ते 2.00 या वेळेत अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अज्ञात पुरुषाचा मृत्यू झाला. वाहनचालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून धडक दिल्यानंतर वाहनासह घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. याप्रकरणी काकती पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 02/2026 नोंद करण्यात आला असून, बीएनएस कलम 281, 106(1) तसेच मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 134 व 187 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास काकती पोलीस करीत आहेत.
मृत व्यक्तीची ओळख (वर्णन)
मृत व्यक्ती पुरुष असून वय अंदाजे 35 ते 40 वर्षे आहे. उंची सुमारे 5 फूट 5 इंच आहे. केस काळे असून सुमारे 3 इंच लांबीचे, दाढी काळी व थोडी पांढरी आहे. अंगाचा रंग गव्हाळ आहे.
त्याने काळ्या रंगाचा पांढरे ठिपके असलेला फुल शर्ट व ग्रे रंगाची जिन्स पँट परिधान केली होती. उजव्या हातावर ‘वसंत’ असे कन्नड भाषेत गोंदलेले (टॅटू) आहे. उजव्या हाताचे अंगठा व तर्जनी नसल्याचे निदर्शनास आले आहे. गळ्यात काळ्या रंगाची दोरी असून त्याला गंडा आहे. उजव्या हातात राखी बांधलेली आहे, तर डाव्या हातात सोन्याच्या रंगाची अंगठी आहे.
या व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे. मृत व्यक्तीबाबत किंवा त्यांच्या नातेवाईकांबाबत कोणतीही माहिती असल्यास बेळगाव शहर पोलीस कंट्रोल रूम (0831-2405233), काकती पोलीस ठाणे (0831-2405203) किंवा पोलीस निरीक्षक, काकती पोलीस ठाणे – मोबा. 9480804115 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले आहे.
