बेळगाव : उडुपी जिल्ह्यातील कुंदापूर तालुक्यातील गोपाडे गावचा ३२ वर्षीय आजीवन कारावास भोगणारा कैदी प्रशांत मोगवीर परोल संपल्यानंतर बेळगाव मध्यवर्ती कारागृहात न परतल्याने फरार झाला आहे. त्याच्याविरुद्ध तसेच त्याचे दोन जामीनदार सुजय आणि राघवेंद्र यांच्याविरुद्ध कुंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णमूर्ती शेट यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, न्यायालयाच्या आदेशानुसार प्रशांत मोगवीर याला २४ सप्टेंबर रोजी २७ दिवसांच्या परोलवर सोडण्यात आले होते. मात्र २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कारागृहात परत येणे आवश्यक असतानाही तो हजर झाला नाही.
कैदीला वेळेत हजर करून देण्यात अपयश ठरल्याने सुजय आणि राघवेंद्र या जामीनदारांविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे. तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २६३(बी) (कायद्यानुसार अटक रोखणे वा अडथळा निर्माण करणे) तसेच कर्नाटक कारागृह (दुरुस्ती) अधिनियम २०२२ अंतर्गत कलम ५७ (परोल संपल्यानंतर कैदी हजर न राहणे) आणि कलम ५८ (समर्पणास अपयश ठरल्यास शिक्षा) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
प्रशांत मोगवीरला ११ एप्रिल २०१५ रोजी ३२ वर्षीय गर्भवती महिलेची हत्या करून तिच्या गळ्यातील सोन्याची साखळी लुटल्याच्या गुन्ह्यात अटक झाली होती. उडुपी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी १४ फेब्रुवारी २०१८ रोजी त्याला फाशीची शिक्षा ठोठावली होती. मात्र उच्च न्यायालयाने २४ जानेवारी २०२४ रोजी न्यायमूर्ती के. एस. मूदगल आणि न्यायमूर्ती वेंकटेश नाईक टी. यांनी शिक्षेत बदल करून मोगवीरला ६० वर्षांचा होईपर्यंत कोणत्याही सवलतीशिवाय आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली होती.
न्यायमूर्ती गोविंदराज यांनी १७ सप्टेंबर रोजी मोगवीरच्या बहिणीने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेत त्याला परोल मंजूर केला होता. याचिकेत नमूद करण्यात आले होते की मोगवीरला एपिलेप्सी आणि न्युरोफिट्सचा त्रास असून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. परंतु वैद्यकीय कारणावर दिलेल्या या परोलचा गैरवापर करून मोगवीर सध्या फरार झाला आहे.
