बेळगाव : बेळगाव मध्यवर्ती बसस्थानक परिसरात प्रवाशांचे लक्ष विचलित करून सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत मार्केट पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी दोन महिला आरोपींना अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे. जप्त केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची किंमत सुमारे 11 लाख 25 हजार रुपये आहे.
या प्रकरणी मार्केट पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 142/2024 (कलम 303(2) बीएनएस), तसेच गुन्हा क्रमांक 38/2024, 51/2024 व 53/2024 (कलम 379 भादंवि) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते. सन 2024 मध्ये मध्यवर्ती बसस्थानकात चार वेळा दागिन्यांची चोरी झाल्याची कबुली आरोपींनी चौकशीत दिली आहे.
या गुन्ह्याच्या तपासासाठी एसीपी मार्केट उपविभाग बेळगावचे श्री. संतोष सत्यनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. जी. एम. कालिमिर्ची यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे —
- आरती उर्फ परिदा शिवा चौगुले (वय 26), रा. वड्डरवाडी (गँगवाडी), बेळगाव
- सरस्वती संतोष रोड्डे (वय 45), रा. वड्डरवाडी (गँगवाडी), बेळगाव
या प्रकरणातील तिसरा आरोपी शिवा रामू चौगुले, रा. गँगवाडी, बेळगाव, हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
तपासात असे उघड झाले की, आरोपी चोरी केलेले सोन्याचे दागिने वितळवून (मेल्ट करून) ते स्वतःच्या नावाने बेळगाव येथील रामलिंगखिंड गल्लीतील एच.डी.बी. फायनान्समध्ये गहाण ठेवत होते आणि त्याद्वारे पैसे उचलत होते. पोलिसांनी पंच व सराफांच्या उपस्थितीत एकूण 76 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले असून त्यांची किंमत अंदाजे 11,25,000 रुपये आहे.
पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली असून फरार आरोपीच्या शोधासाठी पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक श्री. जी. एम. कालिमिर्ची, पीएसआय श्री. विठ्ठल हावन्नवर, श्री. एस. एम. शिंदे, तसेच पोलीस कर्मचारी एल. एस. कडोळकर, नवीनकुमार ई. बी., विश्वनाथ माळगी, आशिर अहमद जमादार, शंकर कुगेळी, सुरेश कांबळे, कार्तिक जी. एम., एम. बी. ओडयार, मल्लिकार्जुन गुदगोप्पा, कु. प्रतिभा विडनवर, सौ. नीताली कोळी, सौ. मोदिना जमालसाबनवर, कु. सावित्री गोडी तसेच तांत्रिक विभागाचे रमेश अक्की व महादेव काशीद यांनी केली.
या यशस्वी कामगिरीबद्दल बेळगाव शहर पोलीस आयुक्त व डीसीपी यांनी पथकाचे कौतुक केले आहे.
