कागवाड, दि. ६ जानेवारी २०२६ :
पत्रकारितेचे व्रत हे विश्वासार्हतेवर टिकून असते. समाजाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य पत्रकार करीत असतात. मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या ‘दर्पण’ या वृत्तपत्राच्या नावातच समाजप्रबोधनाचा आशय दडलेला आहे. समाजाचे वास्तव चित्र समाजासमोर ठेवणारा आरसा म्हणून त्यांनी पत्रकारितेकडे पाहिले. हीच भूमिका कायम ठेवून पत्रकारांनी आपले कार्य प्रामाणिकपणे व निष्ठेने करावे, असे प्रतिपादन शिवानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. पी. तळवार यांनी केले.
कागवाड तालुका पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस. पी. तळवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकार संघाचे संचालक सुकुमार बन्नूरे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये शिवानंद महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. अशोक आलगोंडी आणि ॲड. राहुल कटेगेरी यांचा समावेश होता. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
डॉ. तळवार पुढे म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत पत्रकारिता चौथा स्तंभ म्हणून कार्यरत आहे. पत्रकारांची ताकद सत्तेची निर्मिती करू शकते तसेच सत्तेला आव्हान देण्याचे सामर्थ्यही तिच्यात आहे. आजच्या एआय व डिजिटल युगात पत्रकारांनी स्वतःला अद्ययावत ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. कागवाड तालुक्यातील पत्रकार एकत्र येऊन मराठी पत्रकार दिन साजरा करतात, हे एकात्मतेचे व सामाजिक सलोख्याचे उत्तम उदाहरण असून ते विशेष महत्त्वाचे आहे.
यावेळी ॲड. राहुल कटेगेरी यांनी पत्रकारांनी बातमी प्रसिद्ध करताना तिची सत्यता पडताळून पाहणे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले. बातमीची अचूकता व पुरावे यांची खातरजमा केल्यास भविष्यात कायदेशीर अडचणी टाळता येतात, असे त्यांनी नमूद केले.
प्रमुख उपस्थित प्रा. अशोक आलगोंडी यांनी भारतातील मुद्रणकलेचा इतिहास उलगडून सांगताना, प्रारंभी भारतीय भाषांतील वृत्तपत्रे स्वातंत्र्य चळवळीचा प्रसार व समाजप्रबोधन या उद्देशाने चालविली जात होती, असे स्पष्ट केले. आजच्या पत्रकारितेसमोर वेगळी आव्हाने असून डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावात विश्वासार्हता टिकवणे ही मोठी जबाबदारी आहे, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजसेवक अरुण जोशी यांनी केले. कागवाड तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार रंगनाथ देशिंगकर, तरुण भारतचे सुकुमार बन्नूरे, सकाळचे पत्रकार लक्ष्मण सूर्यवंशी आणि लोकमतचे पत्रकार संदीप परांजपे यांनी मनोगत व्यक्त करून पत्रकारितेच्या सामाजिक भूमिकेवर प्रकाश टाकला.
यावेळी सिद्दया हिरेमठ यांची कागवाड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आणि प्रभाकर गोंधळी यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास संजय काटकर, सचिन कांबळे, बसवराज तारदाळ, अमर कांबळे, महांतेश अडकेरी, शिवाजी पाटील, इरसार अथनिकर, पिंटू अरळे यांच्यासह विविध दैनिकांचे पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
