युनेस्को मान्यताप्राप्त मराठ्यांच्या १२ किल्ल्यांचे वैभव कॅलेंडरमधून साकार
बेळगाव :
टीजेएसबी बँक, बेळगाव शाखेतर्फे नूतन वर्ष २०२६ निमित्त विशेष कॅलेंडरचे अनावरण आज दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी करण्यात आले. गडकिल्ल्यांचे संवर्धन व संरक्षणासाठी कार्यरत असलेल्या बेळगाव येथील श्री दुर्गवीर प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते या कॅलेंडरचे अनावरण करण्यात आले.
यंदाच्या टीजेएसबी बँक कॅलेंडरचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या मराठ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या १२ ऐतिहासिक किल्ल्यांचा समावेश. या कॅलेंडरमध्ये सर्व किल्ल्यांचे आकर्षक छायाचित्र देण्यात आले असून मुखपृष्ठावर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा सुंदर व प्रेरणादायी फोटो आहे. प्रत्येक महिन्यासाठी एका किल्ल्याचा फोटो देण्यात आला असून, त्यासोबत क्यूआर स्कॅनर (QR Code) उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा स्कॅनर स्कॅन केल्यास संबंधित किल्ल्याची सविस्तर ऐतिहासिक माहिती व महत्त्व वाचकांना मिळते.
टीजेएसबी बँक सामाजिक जाणिवेतून विविध उपक्रम राबवत असते. त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या वर्षी युनेस्को मान्यता प्राप्त गडकिल्ल्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने हे माहितीपूर्ण कॅलेंडर तयार करण्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गडकिल्ल्यांचे जतन व संवर्धनासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या दुर्गवीर प्रतिष्ठानच्या सभासदांच्या हस्ते या कॅलेंडरचे अनावरण होणे ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली.
हा कार्यक्रम टीजेएसबी बँक, बेळगाव शाखेत पार पडला. यावेळी बँकेच्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती देण्यात आली, तसेच दुर्गवीर प्रतिष्ठानकडून गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी वर्षभर राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली.
या प्रसंगी टीजेएसबी बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रमोद देशपांडे, सौरभ पाटील, केदार गोखले, राम सांबरेकर, अक्षय मानोजी, भीमराव दळवी, सुनिता हुवन्नावर तसेच दुर्गवीर प्रतिष्ठानचे अभिजीत अष्टेकर, सागर मुतकेकर, संजय गावडोजी, बाबू हनमशेठ, भावनेश पिंगट, योगेश शहापूरकर, राहुल पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.
