टिळकवाडीतील दोन लॉजमधील चोरीचा छडा; संकेश्वर येथील महिला अटकेत, ३२.८६ लाखांचे साहित्य जप्त

टिळकवाडीतील दोन लॉजमधील चोरीचा छडा; संकेश्वर येथील महिला अटकेत, ३२.८६ लाखांचे साहित्य जप्त

बेळगाव : टिळकवाडी परिसरातील दोन लॉजमध्ये झालेल्या चोरीच्या घटनांचा टिळकवाडी पोलिसांनी छडा लावत संकेश्वर येथील एका महिलेला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३२ लाख ८६ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले असून या प्रकरणातील आणखी एक आरोपी फरार झाला आहे.

अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव दीपा महालिंग अवटगी (वय ३३) असे असून ती मूळची करी सिद्धेश्वर गल्ली, महालिंगपूर येथील रहिवासी आहे. सध्या ती संकेश्वर येथे वास्तव्यास होती. तिचा साथीदार शिवानंद उर्फ विनोद शंकर मठपती (रा. शंकरनगर, निपाणी रोड, संकेश्वर) हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

टिळकवाडी पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील कोस्टल एम्पायर आणि अमित डिलक्स या लॉजमध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी दीपाला अटक केली.

तिच्याकडून ११ मोबाईल फोन, एक टॅब, वायफाय डोंगल, तीन कारच्या चाव्या, १४ हजार रुपये रोख, तसेच केए-०४ एमझेड-६५५२ क्रमांकाची फॉर्च्युनर कार आणि एमएच-०९ ईयू-७१२१ क्रमांकाची मारुती सुझुकी एस-क्रॉस कार असा एकूण ३२ लाख ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई खडेबाजार एसीपी शेखरप्पा एच. यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात उपनिरीक्षक विश्वनाथ घंटामठ, प्रभाकर डोळी, तसेच महेश पाटील, एस. एम. करलिंगणावर, नागेंद्र तळवार, सतीश गिरी, लाडजी साब मुलतानी, गंगवा पार्वती आणि तांत्रिक विभागातील रमेश अक्की, महादेव काशीद आदींचा समावेश होता.

फरार आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास टिळकवाडी पोलीस करत आहेत.


Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five + 17 =

error: Content is protected !!