बेळगाव : बेळगाव शहरातील टिळकवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतिनगर परिसरातील दोन घरे तसेच उद्यमबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिदंबरनगर येथील एका घरात झालेल्या घरफोडीप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणात माननीय पोलीस आयुक्त, बेळगाव शहर तसेच माननीय उपपोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली टिळकवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम पुजारी यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक कार्यरत होते. या पथकाने आरोपी जमशेद खान खलील खान (वय 41, रा. हैदराबाद) याला अटक करून त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलिसांनी आरोपीकडून 60 ग्रॅम वितळवलेले सोनं (अंदाजे 6 लाख 90 हजार रुपये), 55 ग्रॅम वितळवलेले सोनं (अंदाजे 6 लाख 32 हजार 500 रुपये), पांढऱ्या रंगाची होंडा अॅक्टिव्हा दुचाकी तसेच विवो कंपनीचे दोन मोबाईल फोन असा एकूण 115 ग्रॅम सोन्याचे दागिने, एक दुचाकी आणि दोन मोबाईल असा सुमारे 13 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या यशस्वी कारवाईत टिळकवाडी पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ घंटामठ यांच्यासह पोलीस कर्मचारी महेश पाटील, एस. एम. करलिंगनवर, नागेंद्र तळवार, सतीश गिरी, लाडजी साब मुलतानी आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल माननीय पोलीस आयुक्त, बेळगाव शहर यांनी तपास पथकाचे कौतुक केले.
