मलप्रभा नदीत सापडल्या चोरीतील तीन दुचाकी; दागिन्यांच्या दुकानफोडीशी संबंध उघड

मलप्रभा नदीत सापडल्या चोरीतील तीन दुचाकी; दागिन्यांच्या दुकानफोडीशी संबंध उघड

बेळगाव : बैलहोंगल तालुक्यातील नयानगर येथे मलप्रभा नदीच्या पात्रात आज सकाळी संशयास्पद अवस्थेत तीन मोटरसायकली आढळून आल्याने खळबळ उडाली. मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिल्यानंतर बैलहोंगल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दुचाकी बाहेर काढण्याची कारवाई केली.

नदीतून बाहेर काढलेल्या होंडा शाइन, अपाची आणि स्प्लेंडर प्लस या तीन मोटरसायकली सौंदत्ती येथे डिसेंबर 2025 मध्ये चोरीस गेलेल्या असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. विशेष म्हणजे, याच वाहनांचा वापर करून नऊ जणांच्या टोळीने सौंदत्तीतील एका दागिन्यांच्या दुकानात चोरी केल्याचे उघड झाले आहे.

दुकानफोडीनंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने सौंदत्तीहून बैलहोंगलमार्गे जाताना या मोटरसायकली मलप्रभा नदीत फेकून दिल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी पत्रकार परिषदेत दिली. पोलिसांनी पंचनामा करून तिन्ही वाहने जप्त केली असून आरोपींचा शोध सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, सीपीआय प्रमोद यलिगार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी पाहणी केली. समाजसेवक मल्लिकार्जुन गाणिगेर व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुमारे दोन तास नदीत उतरून मेहनत घेत दुचाकी बाहेर काढण्यात मदत केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ उत्सुकता व तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

three × one =

error: Content is protected !!