बेळगाव : आबा हिंदी स्पोर्ट्स क्लब व क्रीडा भारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तिसऱ्या पीव्हीआर आंतरराज्य निमंत्रित जलतरण स्पर्धेचा शुभारंभ मंगळवारी सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात पार पडला. भारत मातेची व जलतरण तलावाची विधिवत पूजा करून तसेच दीपप्रज्वलनाने स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी महापौर आनंद चव्हाण, नगरसेवक नितीन जाधव, हिंद स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष अरविंद संगोळी, चार्टर्ड अकाउंटंट राजेंद्र मुंदडा, अध्यक्ष शीतल हुलभते, बीएससी टेक्सटाईल मॉलचे अॅडमिनिस्ट्रेटिव्ह हेड अमजद, इराणा तसेच जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार उपस्थित होते.
यावेळी उपस्थित जलतरणपटू, पालक, प्रशिक्षक व क्रीडाप्रेमींना संबोधित करताना पाहुण्यांनी जलतरणपटूंना प्रोत्साहन दिले. पालक व प्रशिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक करत स्पर्धकांना उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
समारंभात नुकत्याच चेन्नई येथे पार पडलेल्या दिव्यांगांच्या आंतरराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या मयंक हलदर यांनी मिळवलेल्या दोन सुवर्णपदकांच्या उल्लेखनीय यशाबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. उपमहापौर आनंद चव्हाण, नगरसेवक नितीन जाधव व मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.
या आंतरराज्य स्पर्धेत कर्नाटक, गोवा व महाराष्ट्रातील एकूण २५० मुला-मुलींनी सहभाग नोंदवला असून स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी अनेक विक्रम मोडले गेले. स्पर्धेमुळे बेळगावच्या क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
