बेळगाव (प्रतिनिधी ) बेळगाव येथे सुरू असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या अधिवेशनात आमदारांची कमी उपस्थिती हा मुद्दा दुसऱ्या आठवड्यातही कायम आहे. २२४ सदस्यांच्या विधानसभेत १५ डिसेंबर रोजी ज्येष्ठ आमदार शामनूरू शिवशंकरप्पा यांना श्रद्धांजली अर्पण केली जात असताना केवळ सुमारे ५० आमदार सभागृहात उपस्थित होते. यामध्ये जवळपास निम्मे सदस्य विरोधी पक्षाचे होते.
अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यातही हीच परिस्थिती दिसून आली होती. त्या काळात साधारण १०० आमदारांची उपस्थिती होती, त्यापैकी निम्मे सदस्य विरोधी पक्षाचे होते. सत्ताधारी काँग्रेसकडे दोन दिवंगत आमदार वगळता १३५ आमदारांचे संख्याबळ असतानाही सभागृहात अपेक्षित उपस्थिती दिसून आली नाही.
सीमाभागातील बेळगाव शहरात विधानसभेचे अधिवेशन घेण्यामागचा उद्देश उत्तर कर्नाटकातील प्रश्नांवर विशेष लक्ष केंद्रित करणे हा आहे. मात्र आमदारांची सततची तोकडी उपस्थिती अधिवेशनाच्या मूळ उद्देशालाच बाधा आणणारी ठरत आहे. उत्तर कर्नाटकाच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवरील चर्चेलाही अपेक्षित प्रतिसाद व सहभाग मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
