बेळगाव :(प्रतिनिधी) मराठा मंडळ संचालित ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय हे अभ्यास, कला व क्रीडा क्षेत्रांमध्ये नेहमीच बेळगाव जिल्ह्यात अग्रगण्य ठरले आहे. शैक्षणिक गुणवत्तेसह क्रीडाक्षेत्रातही येथील विद्यार्थिनी सातत्याने उल्लेखनीय यश संपादन करत आहेत. यंदाही या परंपरेला साजेसा असा दणदणीत विजय खो-खो संघाने नोंदविला आहे.
अलीकडेच बैलहंगल येथे झालेल्या जिल्हास्तरीय खो-खो स्पर्धेत ताराराणी महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत बेळगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयाचा मोठ्या फरकाने पराभव केला. त्यानंतर अंतिम सामन्यात सवंदत्ती तालुक्याच्या बलाढ्य संघावर एकतर्फी विजय मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली दावेदारी भक्कम केली.
या विजयी संघात कु. नीलम कक्केरकर (कर्णधार), कु. लक्ष्मी हंगिरकर, कु. अपेक्षा निलजकर, कु. साक्षी देवलतकर, कु. वैष्णवी पाटील, कु. प्रणाली पाटील, कु. कावेरी अंधारे, कु. सरस्वती वडेबैलकर, कु. विश्रांती मेलगे, कु. मंगल देवलतकर, कु. रेणुका तोरगल आणि कु. ईश्वरी यांचा समावेश आहे. संघाच्या वेग, चपळाई, समन्वय आणि तत्पर निर्णय क्षमतेमुळे हा अतुलनीय विजय शक्य झाला.
योग्य नियोजन, शिस्तबद्ध सराव आणि मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रोत्साहनातून हा उत्कृष्ट परिणाम साध्य झाल्याचे महाविद्यालयाकडून सांगण्यात आले. प्रशिक्षक प्रशांत पाखरे यांचे मार्गदर्शन, तसेच डॉ. राजश्री नागराजू (अध्यक्षा, मराठा मंडळ) यांच्या प्रेरणेमुळे संघाचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला आहे.
ताराराणी महाविद्यालयाच्या खेळाडूंच्या यशात संस्थेचे संचालक श्री शिवाजीराव पाटील, श्री परशरामअण्णा गुरव, प्राचार्य श्री अरविंद पाटील, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री राहुल जाधव, ज्येष्ठ प्राध्यापक श्री एन. ए. पाटील, क्रीडा प्रमुख प्रा. एम. वाय. देसाई तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी, पालकवर्ग आणि प्रसिद्धी माध्यम यांचा मोलाचा वाटा आहे.
हा विजयी खो-खो संघ २७ नोव्हेंबर रोजी मंड्या येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रवाना होणार असून, अधिक मोठे यश संपादन करण्यासाठी सज्ज आहे.
