पिरनवाडी येथे झालेल्या भीषण अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. अपघातानंतर माजी महापौर विजय मोरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली.
अपघातात दोघांची प्रकृती चिंताजनक होती. विलंब न करता त्यांना प्रथम उद्यमबाग येथील एका नामांकित रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तातडीने उपचार सुरू करण्याऐवजी रुग्णालय प्रशासनाने कागदपत्रे व औपचारिकता यावर भर दिल्याचे समोर आले. जखमींची प्रकृती गंभीर असल्याने वेळ वाया जाणे धोकादायक ठरू शकत होते.
परिस्थितीची गांभीर्य ओळखून विजय मोरे यांनी कोणतीही दिरंगाई न करता जखमींना स्वतःच्या वाहनातून थेट बिम्स (सिव्हिल हॉस्पिटल), बेळगाव येथे हलवले. तेथे स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते निलेश गावडे यांच्या सहकार्याने जखमींना तातडीने दाखल करण्यात आले.
रुग्णालयातील डॉक्टरांनी आगमन होताच तात्काळ आपत्कालीन उपचार सुरू केले. योग्य वेळी मिळालेल्या वैद्यकीय मदतीमुळे जखमींचे प्राण वाचविण्यास मदत झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या घटनेतून आपत्कालीन परिस्थितीत जलद निर्णयक्षमता, जबाबदार नेतृत्व आणि औपचारिकतेपेक्षा मानवी जीवाला प्राधान्य देणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
