बेळगाव, ३१ जुलै २०२५ :
स्वाती सनदी या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी आज डॉ. सोनाली सरनोबत यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांच्या वतीने एक प्रतिनिधीमंडळ पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या निवेदनात स्वातीच्या मृत्यूमागील सत्य उघडकीस आणण्यासाठी सखोल, निष्पक्ष व जलदगती चौकशीची मागणी करण्यात आली.
स्वाती सनदी हिचा मृत्यू १२ जुलै २०२५ रोजी बंगळुरू येथे झाला असून, तिच्या सासरच्या मंडळींनी आत्महत्या असल्याचे सांगितले आहे. मात्र घटनास्थळी आढळलेल्या परिस्थिती व कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या शंका पाहता, सदर मृत्यू हा आत्महत्या नसून संभाव्य खून असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याप्रकरणी पोलिस आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात खालील मागण्या करण्यात आल्या:
स्वातीच्या मृत्यूच्या सर्व पैलूंची सखोल चौकशी
शवविच्छेदन व फॉरेन्सिक अहवाल तातडीने सार्वजनिक करणे
पती व सासरच्या मंडळींना तात्काळ कोठडीत घेऊन चौकशी करणे
स्वातीच्या माहेरच्या कुटुंबीयांना संरक्षण पुरवणे
आरोपींविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवणे
निवेदन सादर करताना डॉ. सरनोबत यांनी सांगितले की, “स्वातीसारख्या मुलींच्या मृत्यूला समाजात फक्त आत्महत्येचा शिक्का लावून विसरले जात असेल, तर हा अन्याय आहे. आम्ही न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही.”
या भेटीनंतर पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी योग्य ती चौकशी करून न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या प्रतिनिधीमंडळात स्वातीच्या नातेवाईकांसह सामाजिक कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातीसाठी न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच राहणार आहे!