बेळगाव : जिल्हा प्रशासन, कन्नड व संस्कृती खाते, जिल्हा पंचायत आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त छ.शिवाजी महाराज उद्यान येथे गुरुवारी सायंकाळी “स्वरांजली” या सुगम संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. संस्कृती खात्याच्या अधिकारी विद्यावती बजंत्री यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
यानंतर गायक विनायक मोरे व अक्षता मोरे यांनी “स्वरांजली” या कार्यक्रमातून शिवरायांवरील प्रेरणादायी गीते तसेच विविध सुमधुर रचना सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या भावपूर्ण गायकीला रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. कार्यक्रमाला गजानन कुलकर्णी यांनी प्रभावी साथसंगत देत रंगत आणली.
संगीतानंतर डॉ. सी. के. जोरापूर यांनी शिवचरित्र आणि शिवरायांच्या कार्याचा परामर्श घेणारे विचारप्रवर्तक व्याख्यान सादर केले. त्यानंतर टी. रविंद्र शर्मा यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने कार्यक्रमाची सांगता रंगतदार झाली.
सुनीता देसाई यांनी सूत्रसंचालनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त आयोजित या सांस्कृतिक सोहळ्याने उपस्थितांच्या मनात शिवरायांप्रती अभिमान व प्रेरणा जागवली.
