बेळगाव – सीमाभागातील मराठी जनतेसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या शुभम शेळके यांच्यावर पोलिस प्रशासनाने तडीपारीची नोटीस पुन्हा बजावल्याने खळबळ उडाली आहे. माळ मारुती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या तक्रारीवरून पोलिस उपायुक्तांनी ही नोटीस दिली असून, ८ ऑगस्ट रोजी स्वतः किंवा वकिलामार्फत हजर राहण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.
शुभम शेळके हे महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, सीमाभागाचे अध्यक्ष असून, गेल्या अनेक वर्षांपासून सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्यायहक्कासाठी आणि कन्नड सक्तीविरोधात ठाम भूमिका घेऊन कार्यरत आहेत. त्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे त्यांना सतत प्रशासनाकडून टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप अनेक मराठी संघटनांनी केला आहे.
तडीपारीची ही नोटीस म्हणजे मराठी कार्यकर्त्यांचे आवाज दाबण्याचा प्रयत्न असून, ही कारवाई पूर्णपणे अन्यायकारक आहे, असा सूर मराठी समाजात उमटत आहे. कर्नाटक सरकारकडून मराठी मतदार, कार्यकर्ते व नेत्यांना लक्ष्य करून दबाव आणण्याचे हे धोरण अलीकडच्या काळात अधिकच वाढले असल्याचे अनेकांनी अधोरेखित केले आहे.
या पार्श्वभूमीवर मराठी समाजाने एकत्र येऊन या अन्यायाविरोधात आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातून व्यक्त केले जात आहे. आगामी काळात या संदर्भात मराठी संघटना आणि कार्यकर्त्यांकडून तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता आहे.