बेळगाव | 14 ऑक्टोबर 2025
कर्नाटक रक्षण वेदिकेचा म्होरक्या नारायण गौडा याने दोन दिवसांपूर्वी बेळगावात मराठी भाषिकांविरोधात प्रक्षोभक वक्तव्य केल्याने सीमाभागात संतापाची लाट उसळली आहे. या वक्तव्याचा निषेध करत युवा समितीचे सीमाभाग अध्यक्ष शुभम शेळके यांनी समाजमाध्यमांवरून नारायण गौडाला प्रत्युत्तर देत “जशास तसे उत्तर दिले जाईल” असे विधान केले.
या पोस्टनंतर माळमारुती पोलिसांनी शुभम शेळके यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असल्याचे समजते. त्यासंबंधी आज सकाळी शुभम शेळके यांना चौकशीसाठी माळमारुती पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले.
यावेळी रक्षण वेदिकेच्या काही कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यातच गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत सखोल चौकशी केली. दिवसभर चाललेल्या या चौकशीनंतर शुभम शेळके यांची जामिनावर सुटका करण्यात आली.
या संपूर्ण प्रकारामुळे सीमाभागातील मराठी समाजात तीव्र असंतोष पसरला आहे. मराठी भाषिक नागरिकांचा प्रश्न आहे की, मराठी लोकांविरुद्ध उघड धमक्या देणाऱ्या नारायण गौडावर कोणतीही कारवाई होत नाही, पण मराठी भाषिकांच्या बचावासाठी बोलणाऱ्या शुभम शेळके यांच्यावर मात्र गुन्हा दाखल केला जातो — ही पोलिसांची दुहेरी भूमिका असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
मराठी संघटनांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला असून, “मराठी समाजावर अन्याय होणार नाही; आम्ही कायदेशीर आणि लोकशाही मार्गाने न्याय मिळवू,” असे स्पष्ट केले आहे.
सध्या बेळगावात वातावरण तणावग्रस्त असले तरी, मराठी कार्यकर्त्यांनी शांतता राखत कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
