बेळगाव : महिलांवरील लैंगिक अत्याचार, शैक्षणिक संस्थांमधील छेडछाड, ड्रग्स विक्री व अनियंत्रित नाईटक्लब्सच्या वाढत्या प्रकारांविरोधात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी श्री राम सेना हिंदुस्थानच्या वतीने आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर संघटनेचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. मोर्चानंतर सदर आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सदर निवेदन केंद्रीय गृह मंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांना देखील देण्यात आले.
या निवेदनात देशभरात महिलांवरील लैंगिक गुन्ह्यांचे वाढते प्रमाण गंभीर चिंतेचा विषय असल्याचे नमूद करण्यात आले असून, शाळा व महाविद्यालये ही सुरक्षित शिक्षणस्थळे राहावीत यासाठी कठोर अंमलबजावणीची गरज व्यक्त करण्यात आली आहे. लैंगिक गुन्ह्यांशी संबंधित भारतीय न्याय संहिता (BNS), पोक्सो कायदा आणि कार्यस्थळी लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याची (POSH) काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
तसेच शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे आणि निवासी भागांच्या आसपास मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अमली पदार्थांच्या विक्रीमुळे युवकांचे भविष्य धोक्यात येत असल्याचे नमूद करून, एनडीपीएस कायद्यान्वये विशेष अंमली पदार्थविरोधी पथकांची स्थापना, गुप्त माहितीच्या आधारे छापे आणि दोषींवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अनियंत्रित नाईटक्लब्स, मद्यविक्री व नियमबाह्य वेळेपर्यंत सुरू असलेल्या आस्थापनांमुळे महिलांची सुरक्षा धोक्यात येत असल्याचे सांगत, अशा आस्थापनांचे परवाने रद्द करणे, सीसीटीव्ही, महिला सुरक्षा कर्मचारी आणि पोलिस पडताळणी बंधनकारक करण्याची मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.
या मोर्चात श्री राम सेना हिंदुस्थानचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह महिला तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. महिलांची सुरक्षितता, युवकांचे भविष्य आणि सामाजिक नैतिकता अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
