क्रीडा प्रतिनिधी, बेळगाव
कामत गल्ली येथील शिवशक्ती युवक मंडळ व भगवा रक्षक कामत गल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वार्ड क्रमांक ३ मर्यादीत क्रिकेट स्पर्धेत शिवशक्ती स्पोर्ट्स कामत गल्ली संघाने प्रभावी खेळ करत उपविजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात त्यांनी हनुमान तालिम मेणसे गल्ली संघावर १० धावांनी विजय मिळवला.
अंतिम सामन्यात शिवशक्ती स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करत १० षटकांत ५ गडी बाद ५२ धावा उभारल्या. त्यानंतर हनुमान तालिम संघाला १० षटकांत ७ गडी बाद ४२ धावांपर्यंत मजल मारता आली, आणि सामना शिवशक्ती स्पोर्ट्सच्या नावावर जमा झाला.
स्पर्धेत वार्डातील एकूण ११ संघांनी सहभाग नोंदविला होता. खेळाडूंच्या उल्लेखनीय कामगिरीनुसार प्रदीप गाडेकर याला सामनावीर, तर ओम याला मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट फलंदाज म्हणून सुमित, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून अकीब यांना सन्मानित करण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभात महादेव मुचंडी, प्रफुल्ल टपालवाले, रमेश कळसण्णावर, विशाल ताशिलदार, चिंतामणी घसरी, विजयसिंग रजपूत, महादेव वेंगुर्लेकर यांसह मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेता आणि उपविजेता संघांना आकर्षक चषक व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बसवराज गणाचारी, विश्वनाथ लोहार, नागेश पवार, किशोर रजपूत, यल्लारी बिडीकर, इरफान बाळेकुंद्री यांनी परिश्रम घेतले.
