बेळगाव (प्रतिनिधी):
शिवराय शिवविचार प्रतिष्ठान – अधिकृत, बेळगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवानिमित्त घरगुती आकर्षक श्रीमूर्ती व सजावट स्पर्धा अत्यंत उत्साहात पार पडली. बेळगाव ग्रामीण, उत्तर व दक्षिण विभागात आयोजित या स्पर्धेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक घरांमध्ये अभिनव कल्पकतेने आणि भक्तिभावाने सजविलेल्या गणरायाच्या मूर्तींनी या स्पर्धेला विशेष आकर्षण प्राप्त झाले.
स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षीस वितरण सोहळा रविवारी, दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी लक्ष्मी रोडवरील श्री महागणपती मंदिराच्या पटांगणात मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला गणेशभक्त, स्पर्धक, प्रतिष्ठानचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाला प्रमुख प्रायोजक म्हणून श्री अरुण गावडे (चेअरमन, सिद्धकला युथ क्लब), श्री कपिल दादा कुरणे (हॉटेल आपुलकी) तसेच शुभम नांदवडेकर व गोवर्धन पाटील यांनी सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळे या सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमाला अधिक बळ मिळाले.
या सोहळ्याला सचिन केळवेकर, शुभम बालेकुंद्री, गणेश सुतार, अंकुश कामत, अभिषेक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला उत्सवी आणि प्रेरणादायी वातावरण प्राप्त झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुजा पाटील यांनी प्रभावीपणे केले. सोनाली सायनक यांनी स्वागत व प्रास्ताविक सादर करून प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली, तर शेवटी विद्या पवार यांनी सर्व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.
या प्रसंगी प्रतिष्ठानतर्फे सांगण्यात आले की, “घरगुती गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक घटकाला सहभागाची संधी देऊन सर्जनशीलतेला चालना देणे आणि श्रद्धा-परंपरेचा वारसा जतन करणे हा या स्पर्धेचा उद्देश आहे.”
गेल्या अनेक वर्षांपासून शिवराय शिवविचार प्रतिष्ठान विविध सामाजिक, सांस्कृतिक व जनजागृतीपर उपक्रम सातत्याने राबवत असून, या उपक्रमांद्वारे बेळगाव शहर व ग्रामीण भागातील युवकांमध्ये सामाजिक बांधिलकी, एकता आणि शिवस्वाभिमान जागविण्याचे कार्य प्रतिष्ठान करत आहे.
