बेळगाव | प्रतिनिधी
राजहंसगड येथील घटनेनंतर अवघ्या काही दिवसांतच बेळगाव शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानाचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. जुना धारवाड रोडवरील रेल्वे ओव्हरब्रिजला ‘पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज उड्डाणपूल’ असे नामकरण करण्याचा प्रस्ताव बेळगाव महानगरपालिकेने यापूर्वीच मंजूर केला होता.
या निर्णयानुसार आज महानगरपालिकेच्या वतीने उड्डाणपुलाजवळ मराठी, कन्नड आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये नामफलक लावण्यात आला. मात्र काही कानडी संघटनांनी विरोध दर्शवत दबाव निर्माण केल्याने, अवघ्या तासाभरातच हा नामफलक हटवण्यात आला. या घटनेमुळे शहरातील शिवप्रेमी आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शहरातील सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या संघटनांवर वेळीच कठोर कारवाई करावी, तसेच हटवलेला नामफलक तात्काळ पुन्हा बसवण्यात यावा, अशी जोरदार मागणी शिवप्रेमी संघटना व नागरिकांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाकडून वारंवार अशा संघटनांना झुकते माप दिले जात असल्याचे आरोपही नागरिकांनी केले आहेत.
या घटनेनंतर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन पुढे कोणती ठोस कारवाई करणार, याकडे संपूर्ण बेळगावकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
