बेळगाव : मराठा लाइट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे आज अत्यंत उत्साहात आणि शौर्याच्या वातावरणात शर्कत दिवस साजरा करण्यात आला. १९१८ मध्ये पहिल्या महायुद्धात मेसोपोटामियातील शर्कतच्या लढाईत मराठा सैनिकांनी दाखवलेल्या अदम्य शौर्याच्या स्मरणार्थ हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांच्या पत्नी सौ. मृणालिनी मुखर्जी तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पत्नींच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आणि जवानांना संबोधित करत मराठा रेजिमेंटच्या पराक्रमाची परंपरा जपण्याचे आवाहन केले. त्यांनी शौर्य, शिस्त आणि सेवाभाव हे मराठा सैनिकांचे अनन्यसाधारण गुण असल्याचे सांगत सर्वांना प्रोत्साहित केले.
कार्यक्रमात विविध सांस्कृतिक सादरीकरणे, देशभक्तिपर गीतं आणि पराक्रमी सैनिकांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता. मराठा लाइट इन्फंट्रीच्या जवानांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेत हा ऐतिहासिक दिवस संस्मरणीय केला.
