बेळगाव : उद्यमबाग जीआयटी कॉलेज शेजारील राजाराम नगर परिसरातील शांती केमिकल्स या कारखान्यातील रासायनिक सांडपाणी शेजारील वस्तीतील विहिरीमध्ये मिसळत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. यामुळे विहिरीचे पाणी पूर्णपणे दूषित झाले असून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी विविध आजारांचे प्रमाण वाढत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे.
या पार्श्वभूमीवर आज संतप्त नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांना लेखी निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली. निवेदनात संबंधित कारखान्याची सखोल चौकशी करावी, विहिरीतील पाण्याची तात्काळ तपासणी करून अहवाल जाहीर करावा, दूषित पाणीपुरवठा थांबवून सुरक्षित पर्यायी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
परिसरातील रहिवाशांनी सांगितले की, विहिरीचे पाणी वापरल्यानंतर त्वचारोग, पोटाचे विकार व इतर आजार वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे महिलांमध्ये व लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.
महानगरपालिका प्रशासनाकडून या निवेदनाची दखल घेण्यात आली असून आवश्यक ती चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आल्याची माहिती नागरिकांनी दिली.
