गरजू विद्यार्थ्यांना ‘शांताई विद्या आधार’चा आधार; शिक्षणासाठी ₹२० हजारांची मदत

गरजू विद्यार्थ्यांना ‘शांताई विद्या आधार’चा आधार; शिक्षणासाठी ₹२० हजारांची मदत

बेळगाव : आर्थिक अडचणींमुळे शिक्षण खंडित होऊ नये, या उद्देशाने शांताई विद्या आधार संस्थेने दोन गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात दिला आहे. संस्थेतर्फे ओजस कंग्राळकर आणि सावी कंग्राळकर या एम. व्ही. हेरवाडकर इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांच्या शाळा शुल्कासाठी एकूण ₹२०,००० ची आर्थिक मदत करण्यात आली.

रॉय रोड, फर्स्ट गेट येथील शांताई विद्या आधार कार्यालयात हा धनादेश विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना औपचारिकरित्या प्रदान करण्यात आला. यावेळी विश्वास पाटील आणि विनायक बोंगाळे यांच्या हस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आला. कोणताही विद्यार्थी केवळ आर्थिक कारणांमुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, हीच संस्थेची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले.

याच वेळी संस्थेतर्फे शाळा तसेच नागरिकांना जुनी वर्तमानपत्रे व पुस्तके दान करण्याचे आवाहन करण्यात आले. या साहित्याच्या विक्रीतून मिळणारा निधी अधिकाधिक गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरण्यात येणार आहे.

गेल्या सुमारे १३ वर्षांपासून कार्यरत असलेली शांताई विद्या फाउंडेशन संस्था दरवर्षी सुमारे ५०० विद्यार्थ्यांना विविध प्रकारे मदत करत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून गरजू मुलांना उज्ज्वल भविष्य देण्याच्या उद्देशाने संस्था सातत्याने कार्यरत असून, हा उपक्रम त्याच दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

thirteen − ten =

error: Content is protected !!