बेळगाव, दि. १९ फेब्रुवारी : शिक्षणासाठी झटणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत शांताई विद्या आधार संस्थेने राणी चन्नम्मा नगर येथील भारतीय विद्या भवन इंग्लिश मिडीयम शाळा मधील इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्यास आर्थिक सहाय्य प्रदान केले.
टिळकवाडी येथील शांताई विद्या आधार कार्यालयात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्याच्या वडिलांकडे धनादेश सुपूर्द करण्यात आला. या प्रसंगी विश्वास पाटील, विनायक बोंगाळे आणि ऍलन विजय मोरे यांची उपस्थिती होती.
माजी महापौर विजय मोरे तसेच विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली शांताई विद्या आधार संस्था सातत्याने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे. या उपक्रमासाठी लागणारा निधी जुनी वर्तमानपत्रे, वापरलेली पुस्तके आणि इतर रद्दी साहित्य संकलित करून उभारला जातो. संकलित रद्दीच्या विक्रीतून मिळणाऱ्या निधीतून आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाते.
या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी विनायक लोकूर, संतोष मामडापूर, सुरज गवळी यांच्यासह अनेक स्वयंसेवक सातत्याने योगदान देत आहेत.
यावेळी आयोजकांनी सांगितले की, आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होऊ नये, हा संस्थेचा प्रमुख हेतू असून भविष्यातही अशा प्रकारच्या उपक्रमांद्वारे अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत मदत पोहोचविण्यात येईल.
