शहापूरातील शिवसृष्टीसमोरील बंद रस्ता लवकरच सुरू; ८० फूटाऐवजी ४० फूट रस्ता खुला करण्याचा निर्णय
बेळगाव : शहापूर येथील शिवसृष्टीसमोरील गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेला रस्ता अखेर लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मात्र, पूर्वीप्रमाणे संपूर्ण ८० फूटाचा रस्ता न खुलता फक्त ४० फूट रुंदीचा भागच नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे.
गेल्या दोन दिवसांपासून बेळगाव शहर महामंडळ आणि भूमापन विभागाचे पथक या रस्त्याचे सर्व्हेक्षण करून नवीन मोजणी करत आहेत. हे काम सर्वसमावेशक विकास आराखडा (CDP) आणि १९७६ साली मंजूर झालेल्या खाजगी लेआउटनुसार करण्यात येत आहे. नागरिकांच्या विनंतीनंतर जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी हस्तक्षेप करून या प्रकरणाचा तोडगा काढण्यासाठी पुढाकार घेतला.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, एकूण ८० फूट रस्त्यापैकी उत्तरेकडील ४० फूट रुंदीचा भाग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. यामुळे शहापूर परिसरातील वाढलेली वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
हा रस्ता ‘स्मार्ट सिटी प्रकल्पा’अंतर्गत तयार करण्यात आला होता. मात्र, मालकांची जमीन योग्य अधिग्रहणाविना वापरल्याने संबंधितांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. धारवाड खंडपीठाने नगरपालिकेला २० कोटी रुपयांचा भरपाई आदेश दिला होता. मात्र, ती रक्कम न दिल्याने मालकांनी कोर्टात अवमान याचिका दाखल केली.
२०२४ मधील सुनावणीवेळी तत्कालीन आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी न्यायालयात हजेरी लावली होती. त्यानंतर महामंडळाच्या सर्वसाधारण सभेत भरपाई न देता जमिन मालकांना परत देण्याचा निर्णय घेण्यात आला. सप्टेंबर २०२४ मध्ये जमीन मालकांना परत देण्यात आल्यानंतर त्यांनी तात्काळ रस्ता बंद केला.
त्यानंतर टीडीआर (Transferable Development Rights) देण्याचा तसेच लोकहित याचिकेचा पर्यायही विचारात घेण्यात आला, मात्र त्यातून काहीही निष्पन्न झाले नाही. अखेरीस CDP नकाशानुसार ४० फूट रुंदीचा रस्ता खुला करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला, जो न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन ठरणार नाही, असे स्पष्ट झाले.
महानगरपालिका आयुक्त शुभा बी. यांनी पालकमंत्री जारकीहोळी यांच्या सूचनेनुसार या रस्त्याच्या पुन्हा उघडण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सर्व्हेक्षण पूर्ण झाल्यानंतर नवीन रस्त्याचे आराखडे निश्चित करून त्याची अधिसूचना काढण्यात येईल.
या निर्णयामुळे शहापूर परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार असून, दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा नागरी विकास वाद अखेर मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
#Belgav #BedhadakBelgav
