बेळगावचे ज्येष्ठ नाट्यकर्मी अनंत रामचंद्र जांगळे यांचे निधन

बेळगावचे ज्येष्ठ नाट्यकर्मी अनंत रामचंद्र जांगळे यांचे निधन

बेळगाव: सुभाष नगर, हिंदवाडी येथील रहिवासी आणि बेळगावातील ज्येष्ठ नाट्यकर्मी तसेच सामाजिक कार्यकर्ते अनंत रामचंद्र जांगळे (वय ७७) यांचे सोमवारी रात्री सुमारे अकरा वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने बेळगावच्या नाट्य आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन चिरंजीव, सुना, दोन भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता शहापूर मुक्तिधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अनंत जांगळे हे सार्वजनिक वाचनालय, जाएंट्स मेन आणि जाएंट्स फेडरेशनचे माजी अध्यक्ष होते. तसेच तुकाराम बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. हिंदवाडी सोशल क्लबचे ते संस्थापक सदस्य होते, तर हिंद हाउसिंग सोसायटीचे संचालक म्हणूनही त्यांनी कार्य केले. बेळगावातील अनेक सामाजिक संघटनांशी त्यांचा निकटचा संबंध होता.

गेल्या पन्नास वर्षांहून अधिक काळ त्यांनी बेळगावात मराठी नाटकांचे प्रयोग आयोजित करून नाट्यरसिकांमध्ये आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. नाट्यप्रेम आणि संघटन कौशल्य यांच्या जोरावर त्यांनी असंख्य कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. विशेष म्हणजे, गेल्या आठवड्यातही त्यांनी बेळगावात नाट्यप्रयोगाचे आयोजन केले होते.

२०१८ साली मुंबई येथे पार पडलेल्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून मिळालेला हा पुरस्कार त्यांच्या नाट्यसेवेची साक्ष देणारा ठरला.

अनंत जांगळे यांच्या निधनामुळे बेळगावच्या मराठी नाट्य क्षेत्रावर शोककळा पसरली असून विविध स्तरांतून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

5 × three =

error: Content is protected !!