खानापूर (हलशी): गोवा सायन्स सेंटर मिरामार, जिल्हा विज्ञान केंद्र गुलबर्गा आणि ज्ञान प्रबोधन शैक्षणिक साधन केंद्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर हायस्कूल, हलशी (ता. खानापूर) येथे “सायन्स ऑन व्हील्स” व “व्हर्च्युअल रिॲलिटी प्रयोग” हा उपक्रम शुक्रवारी (दि. 21 नोव्हेंबर 2025) उत्साहात पार पडला.
या विशेष विज्ञान उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना आधुनिक वैज्ञानिक शोध, संशोधन प्रक्रिया आणि शोधात्मक कौशल्य याबाबत प्रत्यक्ष अनुभवासह मार्गदर्शन करण्यात आले. विज्ञानाच्या विविध शाखांवरील प्रयोग, मॉडेल्स आणि डिजिटल माध्यमातील व्हीआर अनुभवाद्वारे विद्यार्थ्यांनी विज्ञानाची ओळख नव्या दृष्टिकोनातून करून घेतली.
या उपक्रमाचा लाभ घेत शाळेच्या 8वी, 9वी व 10वीच्या विद्यार्थ्यांनी स्वतःही अनेक अभिनव शैक्षणिक प्रकल्प तयार केले. तयार केलेल्या प्रकल्पांचे प्रदर्शन परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी खुले ठेवण्यात आले होते. यामुळे विद्यार्थ्यांनी एकमेकांशी ज्ञान देवाणघेवाण करत विज्ञानाशी मैत्री करत यशस्वी उपक्रम घडवून आणला.
हा विज्ञान उपक्रम शनिवार, दि. 22 नोव्हेंबर रोजीही शाळेत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
