सांबरा येथे शुक्रवारी सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत विजेच्या धक्क्याने एका शाळकरी विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
परिनीती चंद्रू पालकर (वय १३, रा. महात्मा फुले गल्ली, सांबरा) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती सांबरा येथील सरकारी मराठी प्राथमिक शाळेत सातवीच्या वर्गात शिक्षण घेत होती. शुक्रवारी सकाळी घरातील पाण्याची मोटर सुरू करत असताना अचानक तिला जोरदार विजेचा धक्का बसला. धक्का इतका तीव्र होता की ती जागीच कोसळली.
घटनेची माहिती मिळताच गल्लीतील युवकांनी तातडीने तिला खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर परिनीतीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
परिनीती ही अभ्यासू, शिस्तप्रिय व गुणी विद्यार्थिनी म्हणून शाळेत परिचित होती. अभ्यासासोबतच शाळेतील विविध उपक्रमांमध्ये तिचा सक्रिय सहभाग असायचा. तिच्या आकस्मिक निधनामुळे आई-वडील, भाऊ व आजी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर सांबरा गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी घरगुती वीज उपकरणांच्या सुरक्षिततेबाबत अधिक दक्षता घेण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
